पुणे -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प असल्याने हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीब नागरिकांवर उपासमारी सारखे दुसरे नवे संकट उभे ठाकले आहे. याचा विचार करून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांकडून गरजूंना धान्य वाटप करण्यात आले.
निराधार व हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबियांवर लॉकडाऊनमुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून आपत्कालीन निधीतून राष्ट्रवादी तर्फे शहरातील ६ हजार ५०० कुटुंबीयांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. तालुक्यातील सावळ गावामध्ये माजी सरपंच रमेश साबळे यांच्या वतीने १२५ गरजू कुटूंबियांना मोफत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. बारामती येथील जनक्रांती संग्राम या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सचिन जगताप व राजेश पडकर यांनी गरजूंना अन्नधान्य देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील दानशूर व्यक्तींनी १५० कुटूंबियांसाठी धान्य स्वरूपात मदत केली.