पुणे -कोरोना लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक कुटुंबाला तीन महिन्यांचा धान्य पुरवठा सुरू करण्यात आला आहे. हा धान्य पुरवठा रेशन दुकानदारांमार्फत नियमित दरानुसार दिला जाईल. मात्र, 10 एप्रिलनंतर अन्न सुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेखालील कार्डधारकांना अतिरिक्त पाच किलो तांदूळ मोफत मिळणार असल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशन कार्डधारकांना तीन महिन्यांचे मोफत धान्य पुरवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आता प्रत्यक्षात धान्य वाटपाला सुरुवात करण्यात येत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या साठ्यातून नियमित धान्य पुरवठा केला जाणार असून अतिरिक्त तांदूळ पुढील आठवड्यापासून देण्यात येणार आहे. यासाठी रेशन कार्डला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक असल्याचे आमले यांनी सांगितले.