पुणे-लॉकडाऊन काळातआर्थिक संकटात असलेल्या समाजातील अनेक घटकांना दानशूरांनी मदतीचा हात दिला आहे. गणेशोत्सवातही समाजासाठी अखंडपणे कार्य करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे येथील ग्राहक पेठेतर्फे समाजातील योद्ध्यांना विघ्नहर्ता गणेशाची मूर्ती भेट देण्यात आल्या. सुमारे २२१ शाडूच्या गणेश मूर्ती समाजातील या घटकांना देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत पार पडला.
ग्राहक पेठेच्या खजिना विहीर चौकातील केंद्रामध्ये शाडूच्या २२१ गणेश मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. विघ्नहर्ता गणेश केंद्राचे उद्घाटन व उपक्रमाचा शुभारंभ खडक पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, अनंत दळवी, शैलेश राणिम, उदय जोशी आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार, बँड वादक, पुरोहित, लिज्जत पापडचे कामगार, वस्ती विभागातील कार्यकर्ते, मंडप कामगार, तुळशीबागेतील कर्मचारी आदींना गणेश मूर्ती विनामूल्य देण्यात आल्या आहेत.