भंडारा- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील तीन महिन्यांपासून राईस मिल मालकांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल सुरू झालेली आहे.
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल करून त्या धानाचे तांदूळ करून देण्याची प्रक्रिया हे राईस मिल मालक करतात. त्यासाठी सरकार त्यांना एक ठराविक रक्कम देते. मात्र, पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातील राईस मिलरने काही मागण्यांना घेऊन मागील तीन महिन्यांपासून ही धानाची उचल बंद केली होती. धान भरडाईसाठी उचलणे बंद झाल्याने धान खरेदी केंद्रांवर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. कारण, धान खरेदी केंद्रावरील गोदामे पूर्णपणे बंद झाले होते.
हेही वाचा-यंदाच्या अर्थसंकल्पात किरकोळ व्यापाऱ्यांना उभारी देणारी योजना जाहीर करावी - व्यापारी संघटना
धान खरेदीही थांबली होती-गोदामे भरल्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धानाची खरेदी थांबविण्यात आली होती. तर काही धान खरेदी केंद्रावर धान्य खरेदी करून ते गोदामाच्या बाहेर ठेवण्यात आले होते. अशातच जर पाऊस आला असता तर शेतकऱ्यांचा आणि सरकारचेही नुकसान होऊ शकत होते. त्यामुळे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वनाथ कदम, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी यावर तोडगा काढत राईस मिल मालकांना धानाची उचल करण्याची विनंती केली.