पुणे -कुख्यात गुंड गजानन मारणे याला शनिवारी रात्री सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर पुन्हा त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. खुनाच्या दोन गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे याची तळोजा कारागृहातून 15 फेब्रुवारी रोजी सुटका करण्यात आली होती. परंतु, कारागृहातून सुटल्यानंतर मोठे शक्तिप्रदर्शन करत गजा मारणे याने पुणे मुंबई महामार्गावरून मिरवणूक काढली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात पुन्हा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पाच ते सात गुन्हे दाखल केले होते. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर अवघ्या वीस दिवसात त्याची रवानगी पुन्हा एकदा येरवडा कारागृहात करण्यात आली.
गुंड गजानन मारणे : तळोजा कारागृहातून सुटका ते पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी तुरुंगातून सुटल्यानंतर बेकायदेशीररीत्या जमाव एकत्र करून जंगी स्वागत
तुरुंगातून सुटल्यानंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या जमाव एकत्र केल्याच्या आरोपावरून गजा मारणे आणि त्याच्या काही साथीदारांवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात गजा मारणेसह त्याच्या नऊ साथीदारांना अटकही करण्यात आली होती. कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयाने या सर्वांना जामीन मंजूर केला होता. परंतु या मधल्या काळात गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर वारजे, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, खालापूर, बंडगार्डन पोलीस ठाणे या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. वारजे पोलीस ठाण्यातील गुन्हा पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते.
'पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक असलाच पाहिजे'
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गजा मारणे प्रकरणावरून पुणे पोलिसांना सुनावताना पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक असलाच पाहिजे असे सांगत खडसावले होते. तर राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे पुणे पोलिसांना आदेश दिले होते. तेव्हापासून पुणे पोलीस गजा मारणेच्या मागावर होते. परंतु तो पोलिसांना हुलकावणी देत राहिला. मध्यंतरी तो वडगाव मावळ न्यायालयात हजर राहिला आणि तेथील गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यात यशस्वी झाला. परंतु तरीदेखील पुणे पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते.
सापळा रचून अटक
दरम्यान पुणे पोलिसांना हुलकावणी देणारा गजा मारणे महाबळेश्वर वाई परिसरात फिरत असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सातारा पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. शनिवारी तो आपल्यात चारचाकी गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा अटक केली. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेत एमपीडीए कायद्यांतर्गत त्याची रवानगी पुन्हा एकदा येरवडा कारागृहात केली.