बारामती :कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिल ते १ मेदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आज बारामतीतील व्यावसायिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना कडकडीत बंद ठेवत संचारबंदीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
शहरातील रस्त्यांवर अत्यावश्यक सेवा वगळता एकही वाहन व नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिक ठिकाणी बॅरिकेडस लावण्यात आले आहेत.
पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर बारामतीत आत्तापर्यंत ६६ हजार ९०७ लसीकरण बारामतीत मागील काही दिवसांपासून कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दररोज दोनशेहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आत्तापर्यंत बारामतीतील रुग्णसंख्या १२ हजार ६७९ वर गेली आहे. यापैकी ९ हजार ८६८ रुग्ण बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत १९८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच बारामतीत लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत ६६ हजार ९०७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. काल एकाच दिवसात ४ हजार ६०२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.
प्रशासनाची तत्परता
मागील वर्षभरापासून कोरोना संक्रमित रुग्णांना बारामतीच्या आरोग्य प्रशासनाकडून उत्तम सुविधा दिल्या जात आहेत. कोणत्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही. याबाबत कमालीची दक्षता येथील आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. मागील वर्षी बारामतीत बारामती 'पॅटर्न' राबवून कोरोना संक्रमित रुग्ण संख्या शून्यावर आणण्यात प्रशासनाला यश आले होते. सध्याची वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन सज्ज
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधासह टाळेबंदी लागू केली आहे. तसे आदेशही काढण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी बारामतीतील पोलीस प्रशासन सज्ज असून बारामती उपविभागात २१ अधिकारी, ४८२ पोलीस कर्मचारी, २४७ होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये बारामती शहर व तालुक्यासाठी १६ अधिकारी, २१२ पोलीस कर्मचारी, १२४ होमगार्ड तर इंदापूर तालुक्यात १३ अधिकारी, १७० पोलीस कर्मचारी, १६३ होमगार्ड तैनात करण्यात आल्याची माहिती बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.