पुणे : संभाजीनगरची परिस्थिती गंभीर आहे. याची आम्हाला जाणीव आहे. परंतु, संभाजीनगर नाव दिल्याने काही लोकांच्या मनामध्ये पोटशुळ उठला आहे. त्यामुळे विरोधक सरकारवर आरोप करीत आहेत. दंगल घडवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न स्वतःच करायचे अन आरोप सरकारवर करायचा सपाटा विरोधकांनी लावल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी विरोधकावर केला आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस असताना कधीही दंगल झाली नाही. सरकारने संभाजीनगरचे रिपोर्ट घेतलेले आहेत. तिथले सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत. त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा होणार आहे. त्यामुळे चुकीचे आरोप करणे थांबवले पाहिजे. हिंदू सण सर्वांनी एकत्र येत साजरे केले पाहिजे, असे देखील गिरीश महाजन म्हणाले.
सभेसंदर्भात प्रशासन निर्णय घेणार : वीर सावरकर यात्रा तसेच उद्धव ठाकरेंची संभाजीनगरमध्ये होणारी सभा यासंदर्भात प्रशासन निर्णय घेईल. प्रशासनात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. ते त्या ठिकाणची परिस्थिती पाहतील, दंगल झाली खरे आहे. मात्र, अशा परिस्थितीत सभा घेणे योग्य आहे की, आयोग्य ते प्रशासन ठरवेल असे महाजन म्हणाले.