पुणे Gas Leak In PCMC : पिंपरी चिंचवड शहरामधील एका जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाल्यानं पोहण्यासाठी आलेल्या 20 ते 25 जणांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यानंतर 10 ते 12 जण या त्रासानं बेशुद्ध पडल्यानं मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बेशुद्ध पडलेल्या नागरिकांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना सकाळी आठच्या सुमारास कासारवाडी परिसरात घडली आहे.
जलतरण तलावात वायूगळती :कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात सकाळी 20 जण पोहण्यासाठी आले होते. त्याचबरोबर या ठिकाणी देखभाल करणारे आणि सुरक्षारक्षक देखील होते. तलावात पोहताना मात्र अचानक अनेक जणांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. परिसरात गॅस पसरल्यानं काही मीटरपर्यंत नागरिकांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर जलतरण तलावातील नागरिक बेशुद्ध पडू लागले. घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली.