पुणे - देशभर स्वच्छतेचे धडे गिरवले जात असताना औद्योगिक हब म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या शिक्रापूरचा कचरा प्रश्न चिघळला आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत महिला कचरा घेऊन दाखल झाल्या होत्या. कचरा प्रश्न सोडवा अन्यथा, ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार असल्याचा इशार यावेळी महिलांनी दिला.
वाढत्या शहरीकरणाचे जाळे दिवसेंदिवस वाढत असताना शिक्रापूर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य सर्वत्र दिसत आहे. तर काही ठिकाणी कचऱ्याने पेट घेतल्याने धुराचे लोट येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजच्या त्रासला कंटाळून अखेर ग्रामस्थ व महिलांनी आंदोलनाचा पावित्रा घेऊन आज थेट ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत कचरा घेऊनच प्रवेश केला. कचरा प्रश्न सोडवा, अन्यथा कार्यालयाला टाळेच ठोकू असा पवित्रा नागरिकांनी घेताला.
शिक्रापूरचा कचरा प्रश्न पेटला शिक्रापूर गावातील गोळा होणारा कचरा अनेक वर्षांपासून वेळ नदीपात्रामध्ये गोळा करून त्याच ठिकाणी जाळून विल्हेवाट लावली जात आहे. परंतू, येथे जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या धुराचा येथील सोंडेमळा, महाबळेश्वर नगर, ग्रामीण रुग्णालय परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत आहे. अनेकांना धुरामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे.
गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर व रुग्णालय देखील या कचरा टाकलेल्या जागेपासून काही अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अनेकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करून देखील कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. अनेकदा जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याचे लोळ संपूर्ण गावामध्ये पसरत आहेत. त्यामुळे अनेकांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांना वेगवेगळे आजार झालेले असून डासांचा उपद्रव येथे वाढलेला आहे.