पुणे (पिंपरी) - पिंपरीत टोळक्यांचा धुडगूस काही थांबेना असे दिसत आहे. आताही 100 जणांच्या टोळक्याने दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून धुडगूस घातला. पिंपरीतील नेहरूनगर येथे 10 वाहनांची या टोळक्याने तोडफोड केली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेश मंजुळे, असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस उपायुक्त इप्पर यांनी ही माहिती दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. सर्वसामान्य जनतेच्या वाहनांची तोडफोड केल्याने मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई कोण देणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यापूर्वी सांगवी परिसरात अज्ञात तिघांनी 24 चारचाकी वाहनांची तोडफोड केली होती. यात स्कूल बस, रुग्णवाहिकेचा देखील समावेश होता. आता पुन्हा 100 जणांच्या टोळक्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान केले. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.