पुणे - रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना लुबाडण्याचा तयारीत असणाऱ्या चार जणांच्या टोळीला अटक करण्यात आले. गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून आरोपींकडील प्राणघातक हत्यारे जप्त केली आहेत. अमोल अंकुश लामतुरे (वय-19), युवराज कल्याण चव्हाण (वय-30), मनोज सुभाष पवार (वय-30), कुंदन रमेश शिंदे (वय-27) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अझहर शेख अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
प्रवाशांना लुबाडण्याचा होता डाव -
मालधक्का चौक ते पुणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणार्या हनुमान मंदिराजवळ चार ते पाच व्यक्ती प्राणघातक हत्यारांसह रेल्वे प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वरील आरोपींना पकडण्यासाठी शनिवारी रात्री नऊ वाजता पुणे स्टेशन परिसरात सापळा रचला. परंतु आरोपींना संशय आल्याने त्यांनी पळ काढला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या चार आरोपींच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेले -
अटक केलेले आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, जाळपोळ, सरकारी कामात अडथळा आणणे, असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दिवाळीमुळे रेल्वे आणि बसमध्ये गर्दी असणार आहे. याचा फायदा घेऊन चोरीच्या अनेक घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.