महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ganeshotsav 2023: 'दगडूशेठ'च्या अयोध्या श्रीराम मंदिर सजावटीचं मंगळवारी उद्घाटन, राष्ट्रीय सरसंघचालकांच्या हस्ते होणार 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठापना - ganesha Prana Pratishtha

Ganeshotsav 2023 : यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई ट्रस्टनं अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची सजावट केलीय. त्याचं उद्घाटन मंगळवारी होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. (Ayodhya Shriram temple decoration inauguration)

Ganeshotsav 2023
गणेशोत्सव २०२३

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 4:14 PM IST

हेमंत रासने यांची प्रतिक्रिया

पुणे Ganeshotsav 2023: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdusheth Halwai Public Ganapati Trust), सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीनं ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलीय. गणेश चतुर्थीला मंगळवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचं उद्घाटन सायंकाळी ७ वाजता होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.


'श्रीं'ची आगमन मिरवणूक :मंगळवारी प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून 'श्रीं'ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ साकारण्यात आलाय. श्री हनुमानाच्या ४ मूर्ती रथावर लावण्यात येणार आहेत. प्रतिष्ठापनेनंतर उत्सवमंडपात दुपारी १२ पासून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असं आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आलंय. सायंकाळी सजावटीचे उद्घाटन करण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित केलंय. (Ayodhya Shriram temple decoration inauguration)


श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी :पुढील वर्षी सन २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होतेय. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदा होणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे. मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी उभारण्यात आले आहेत. मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर आहे. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस आहेत.


रामायणातील घटनांचा आढावा : मुख्य सभागृहात श्री गणरायाचं मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये ६० खांबांवर वानरसेनेच्या मूर्तींसह रामायणातील घटनांचा आढावा हा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात आलाय. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात आला आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचं आकर्षण असणार आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी सजावटीचं काम, विद्युतरोषणाइचं काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केलीय. (ganesha Prana Pratishtha)

महिलांचे अथर्वशीर्ष पठण :बुधवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरीत्या अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत हरी जागरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भारतीय वारकरी मंडळ व समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. याशिवाय उत्सवांतर्गत सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री गणेशयाग आणि दुपारी १ ते ५ यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने लक्षअर्चनासहित नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. भाविकांना स्वहस्ते अभिषेक पहाटे ५ ते सायंकाळी ५ यावेळेत मंडपात करता येणार आहेत.


सामूहिक सत्यविनायक पूजेचं आयोजन :उत्सवमंडपात बुधवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ यावेळेत सामूहिक सत्यविनायक पूजेचं आयोजन करण्यात आलंय. सत्यविनायक पूजा ही भगवान शंकर व पार्वती मातेला ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिशक्ती, सूर्य या पाच देवतांनी सांगितली आहे, असं सत्यविनायक पोथीत सांगण्यात आलंय. सत्यविनायक पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. ते भाविकांपर्यंत या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे.


'श्रीं'ची वैभवशाली सांगता मिरवणूक :उत्सवात 'श्रीं'ना दररोज विविध पदार्थांचा भोग लावण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी भक्तांना प्रसाद म्हणून त्याचं वितरण केले जाईल. मंदिर व उत्सव मंडप परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलीय. दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. एकादशीच्या दिवशी दिनांक २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत मंत्र जागर होणार आहे. अनंत चतुर्दशीला दिनांक २८ सप्टेंबर रोजी 'श्रीं'ची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री गणाधिश रथातून निघणार आहे.


जय गणेश आरोग्यसेवा अभियान :जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात ३ ठिकाणी सुसज्ज अशी २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र असणार आहेत. मंदिरासमोर संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर यांचं पहिले केंद्र असणार आहे. तर, बेलबाग चौकाजवळ सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी, जहांगिर हॉस्पिटल, ससून सर्वोपचार रुग्णालय यांचं दुसरे केंद्र असेल. याशिवाय मुख्य उत्सव मंडपाच्या मागील बाजूस तिसरे केंद्र उभारण्यात येणार आहे. ससून सर्वोपचार केंद्र, भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल बाणेर यांचे असणार आहे.



ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था : उत्सवकाळात होणारी गर्दी पाहता ट्रस्टतर्फे 'श्रीं'चे दर्शन भाविकांना एलईडी स्क्रिनद्वारे घेता यावे, याकरिता ५ एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहेत. उत्सव मंडपाच्या दोन्ही मागील बाजूस लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर व मूळचंद दुकानाशेजारी तीन एलईडी स्क्रिन तसेच बेलबाग चौक, बुधवार चौक येथे दोन स्क्रिन लावण्यात येणार आहेत. 'श्रीं'चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टनं केलीय. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आलीय. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आलंय.


सीसीटिव्ही कॅमेरे :सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटी पोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमेऱ्यांचा वॉच उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल १५० कॅमेऱ्यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची २०० पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.

हेही वाचा :

  1. Ganeshotsav 2023 : सोलापूरमध्ये गेल्या वीस वर्षांपासून मुस्लिम मूर्तिकार साकारतोय बाप्पाची मूर्ती...
  2. Ganeshotsav २०२३ : 'बाप्पा'चा थाट; चांदीच्या मूर्ती, अलंकारांना ग्राहकांची मोठी मागणी
  3. Ganeshotsav २०२३ : गणरायाच्या आगमनाची तयारी जोरात; 'इको फ्रेंडली' मखरांकडं ग्राहकांचा कल

ABOUT THE AUTHOR

...view details