महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Eco Friendly Ganesha Idol : पुण्यातील पेटंट मिळविणारे पहिले शिल्पकार; पेटंटला दिले 'रवींद्र मिश्रण' नाव... - इको फ्रेंडली गणपती

यंदा लाडक्या गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर रोजी होणार असून जवळपास महिनाभराचा कालावधी राहिला आहे. शाडू मातीच्या मूर्तीपेक्षाही वजनाला हलकी असणारी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी अनोखे असे नवीन मिश्रण तयार केले आहे. तर धोंडफळे यांनी तयार केलेल्या मिश्रणाला पेटंट मिळाले आहे.

Ganeshotsav 2023
मुर्तिकराला मिळाले पेटंट

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 10:23 PM IST

माहिती देताना शिल्पकार अभिजित धोंडफळे

पुणे: पुण्यातील गणेश उत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. तसेच शहरातील मूर्तिकार हे देखील जगप्रसिद्ध असून, विविध प्रकारच्या मूर्ती या मूर्तिकारांच्या वतीने बनवल्या जातात. अश्यातच पुण्याचे शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी केलेल्या मिश्रणाला पेटंट मिळाले आहे. त्यांनी त्यांच्या या पेटंटला वडिलांचे नाव दिले आहे. त्यामुळे त्यांना 'रवींद्र मिश्रण’ या नावाने पेटंट मिळाले आहे.



पेटंट मिळविणारे पहिले शिल्पकार : पीओपीच्या मूर्तीचा वापर टाळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीचा वापर जास्त प्रमाणात व्हावे, यासाठी जनजागृती केली जात आहे. अश्यातच वजनाला हलकी असणाऱ्या मूर्ती साकारण्यासाठी शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी एक नवीन मिश्रण तयार केले आहे. या मिश्रणाला त्यांनी वडिलांचे नाव दिले आहे. 'रविंद्र मिश्रण' असे नाव त्यांनी दिले असून, त्यांना या मिश्रणाचे पेटंट देखील मिळाले आहे. अश्या पद्धतीचे पेटंट मिळविणारे ते पहिले शिल्पकार ठरले आहेत.




इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनविली: शिल्पकार अभिजित धोंडफळे म्हणाले की, साधारणतः हा 22 ते 23 वर्षापूर्वी इको फ्रेंडली गणपतीची चळवळ पुण्यात सुरू झाली. मी अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन मुलांना याबाबत प्रशिक्षण देत होतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवू नये, तर पर्यावरण पूरक मूर्ती बसविल्या पाहिजे. हे सांगत असताना मुलांना पालकांना तसेच लोकांमध्ये याबाबत जनजागृती तयार झाली. जेव्हा 2016 साली पंतप्रधान यांनी याबाबत सांगितले तेव्हा या चळवळीला वेगळे रूप आले आणि मोठ्या प्रमाणात लोक इको फ्रेंडली गणपतीकडे वळू लागले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, जेव्हा इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनविली जाते तेव्हा त्याबाबत खूप समस्या येतात. मूर्ती घेऊन जात असताना त्या तुटल्या जातात. ही बाब लक्षात आल्यावर मी विचार केला की काहीतरी मिश्रण तयार केले पाहिजे.

मिश्रणात या घटकांचा वापर केला : शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी जे मूर्ती बनविताना जे मिश्रण तयार केले आहे. ते पाण्यात टाकल्यानंतर मिश्रण विरघळण्याचा कालावधी, त्याचा पर्यावरणावर होणारा परिमाण यासह अनेक बाबींच्या चाचण्या घेण्यात आल्या. जुलै 2019 मध्ये पेटंटसाठी नोंदणी केली होती. सर्व प्रक्रीया पार पडल्यानंतर नुकतेच पेटंट मिळाले आहे. त्यांनी जो मिश्रण केले आहे त्यात गाळाची माती, शाडू माती, भाताचे मऊ तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा या घटकांचा वापर करण्यात आला आहे. तसेच याच वैशिष्ट्य असे आहे की, हे पूर्णतः रसायन आणि रासायनिक विरहित आहे. मूर्ती विसर्जन केल्यानंतर माती झाडांसाठी देखील वापरता येते. या मिश्रणामुळे दणकट मुर्ती देखील तयार होते. तयार झालेल्या मूर्तीचे वजन देखील कमी असते. विशेष म्हणजे शाडूमातीच्या मूर्तीपेक्षा ही मूर्ती लवकर सुकते. मूर्तीवर कोणत्याही प्रकारचे रंगकाम करता येते.

आर्धा तासात मूर्ती पूर्णपणे विसर्जित : 2016 ते 19 या तीन वर्षात मी यावर अभ्यास केला. शेकडो प्रकारचे मिश्रण तयार केले. अनेक प्रयोग केले. पण शेवटी 2019 साली मी गाळाची माती, शाळूची माती, भाताची तुस असे मिश्रण करून मूर्ती बनविली. तेव्हा जादुई निकाल मिळाला. या मिश्रणाने मूर्ती तयार केली तर चांगली फिनिशिंग, तसेच वजनाला कमी, आणि हाताळायला सोपी अशी मूर्ती तयार होत आहे. विशेष म्हणजे विसर्जन करताना आर्धा ते पाऊण तासात मूर्ती पूर्णपणे विसर्जित होते.असे देखील यावेळी धोंडफळे म्हणाले.

वडील आहेत मोठे शिल्पकार : रविंद्र मिश्रण हे जे नाव दिले आहे. त्याबाबत धोंडफळे म्हणाले की, माझे वडील हे खूप मोठे शिल्पकार आहे. गेली 82 वर्ष आमच्या येथे एकही गणपती हा प्लास्टर ऑफ पॅरिसचा झालेला नाही. माझ्या आजोबांनी केलेला पांगुळ अळीचा गणपती पर्यावरण पूरक पेपर लगद्यापासून १९५५ मध्ये केलेली मूर्ती अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. वडील रवींद्र यांचेही पर्यावरणपूरक कागदी लगद्याचे अनेक गणपती पुण्यात आणि पुण्याबाहेर गेले आहेत. यातूनच प्रेरणा घेत मी या मिश्रणाला 'रविंद्र मिश्रण' हे नाव दिले आहे.

हेही वाचा -

  1. Ganeshotsav 2023: पुण्यात गणेश मंडळाच्या देखाव्याची लगबग सुरू, यावर्षी 'हा' देखावा असणार विशेष आकर्षण
  2. Ganeshotsav 2023 : यंदा पुण्यात बाप्पा झाले 'महाग'; पुणेकरांची कोणत्या मूर्तींना आहे पसंती?
  3. Ganeshotsav 2023 : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! सरकारने गणेशोत्सवावरील निर्बंध उठवले

ABOUT THE AUTHOR

...view details