पुणे- राज्यभरात मोठ्या उत्साह आणि धुमधडाक्यात गणेश चतुर्थी हा सण साजरा होत आहे. लाडक्या गणपती बाप्पांची मोठ्या आनंदाने सेवा केल्यानंतर आता त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे. ढोल ताशांच्या गजरात शहरातील विविध गणेश मंडळांनी बाप्पाचे स्वागत केले होते. आता त्यांना निरोपही उत्सहाने देण्याची तयारी पुण्यातील गणेश मंडळांनी केली आहे.
राज्यभरातील गणेशभक्तांचे लक्ष लागलेल्या पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी होत आहे. लाडक्या बाप्पाला वाजतगाजत निरोप देण्यासाठी मानाच्या गणपतीसह सर्व मंडळांनी विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे. तसेच बाप्पासाठी आकर्षक रथ देखील तयार करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता मंडई इथल्या टिळक पुतळ्या पासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
...जाणून घ्या विविध गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे वेळापत्रक
१) मानाचा पहिला कसबा गणपती
ग्रामदैवत कसबा गणपतीची मिरवणूक महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून उद्या सकाळी साडेदहा वाजता निघणार आहे. ही मिरवणूक महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आरती होऊन सुरू होईल. यामध्ये रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना व कलावंत ही तीन ढोलताशा पथके तसेच, मुलींचे दोर मल्लखांब पथक व रोटरी क्लब यांचाही मिरवणुकीत सहभाग असेल.
२) मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती
ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मिरवणुकीत सर्वांत पुढे सतीश आढाव यांचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅंड, शिवमुद्रा, ताल व समर्थ पथकांचे ढोलवादन होणार आहे. ‘विष्णूनाद’चे कार्यकर्ते शंखनाद करणार आहेत. पारंपरिक पोषाखात अश्वारूढ कार्यकर्ते आणि महिलाही पारंपरिक वेशात सहभागी होणार आहेत. चांदीच्या पालखीतून ‘श्रीं’ची मिरवणूक काढली जाणार आहे.
३) मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती
लक्ष्मी रस्त्यावरील गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीच्या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज बॅंड, नादब्रह्म, गर्जना या पथकांचे ढोलताशा वादन होणार आहे. ‘श्रीं’च्या मूर्तीची मिरवणूक फुलांनी आकर्षक सजावट केलेल्या ‘हरे कृष्णा’ रथातून निघणार आहे. त्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
४) मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
तुळशीबाग मंडळाने २४ फूट उंचीचा फुलांची सजावट केलेला मयूर रथ तयार केला आहे. त्यामध्ये १२ फूट उंचीची कमान असून, त्यात गणपतीची मूर्ती असणार आहे. मिरवणुकीच्या सुरवातीला लोणकर बंधूंचा नगारा असणार आहे. गजलक्ष्मी, हिंद तरुण मंडळ, स्वरूपवर्धिनी ही तीन ढोतलाशा पथके वादन करणार आहेत. अवयवदान व ‘ओम नमो परिवार’ या संस्थांच्या महिलांचे पथक सामाजिक संदेश देणार आहे.