पुणे - कोरोना विषाणू प्रादूर्भावाचा यावर्षीच्या सणांवर थेट परिणाम झाला आहे. सणांशी निगडित व्यवसायांना देखील आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. काही तासांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेशमूर्ती विक्रीमध्ये 30 टक्के घट झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे. गणेश भक्त शाडूच्या गणेश मुर्त्यांना प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोना संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर व्यवसाय ठप्प झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीच्या तुलनेत गणेश मुर्त्यांच्या किंमती कमी केल्याचे व्यवसायिक सांगत आहेत.
पिंपळे गुरवमध्ये गणेशमूर्ती विक्रीत घट पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात असणारा साई आर्टस् गणेशमुर्ती कारखाना कांचन कलढोनी आणि गोरख कलढोनी चालवतात. दरवर्षी त्यांच्याकडे हजारो गणेश मुर्त्यांचे बुकिंग व्हायचे. मात्र, यावर्षी बुकिंगमध्ये 30 टक्के घट झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियम आणि अटींनुसार 4 फुटांपर्यंत गणेश मुर्त्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, शहरातील 50 टक्के सार्वजनिक गणेश मंडळे गणेशोत्सव साजरा करणार नसल्याने यावर्षी मोठ्या गणेश मुर्त्यांना जास्त मागणी नाही, असे व्यवसायिक सांगतात. परंतु, घरगुती गणपती मुर्त्यांना चांगला प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना गणेशमूर्ती कारखानदार कांचन कलढोनी म्हणाल्या की, गणपती मूर्ती विक्रीमध्ये 30 टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी बनवलेल्या सर्व गणेश मूर्तींची विक्री झाली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे उत्पन्नावर देखील याचा फटका बसला आहे. पीओपी पेक्षा शाडू मातीच्या मूर्तीला ग्राहक पसंती देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मुर्त्यांची किंमत कमी आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडून यावर्षी जास्त बुकिंग झाले नाही. दरवर्षी मोठ्या मुर्त्यांचे बुकिंग 40 टक्के होत असे. घरगुती गणेशोत्सवाला प्रतिसाद मोठा आहे. मात्र, कोरोनाचा फटका मूर्ती व्यवसायाला बसला आहे अस त्यांनी सांगितले आहे. गणेश मूर्ती विक्री स्टॉलधारक सोनाली देवकर यांनी सांगितले की, शाडू मातीच्या मुर्त्यांना जास्त मागणी आहे. यावर्षी 4 फुटांपर्यंत गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास परवानगी असल्याने लहान मूर्तीला जास्त मागणी आहे. व्यवसायात मोठा फरक जाणवत असून याचा फटका बसला आहे.पीओपी ऐवजी गणेशभक्तांनी शाडू मातीच्या मुर्त्यांना प्राधान्य दिले आहे. हीच परिस्थिती स्टॉल धारकांची असून लहान मूर्ती आणि शाडू मातीच्या मूर्तींना अनेक ग्राहकांनी पसंती दिली आहे असे सोनाली देवकर यांनी सांगितले आहे.