महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 15, 2020, 1:41 AM IST

ETV Bharat / state

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.कोरोना विषाणू संदर्भात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात ते लोकप्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत बोलत होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी 50 हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट किट घेण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

ajit pawar
अजित पवार

पुणे-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी आषाढी वारी, बकरी ईद, दहिहंडी असे सर्व सण-समारंभ मर्यादित उपस्थितीत साजरे करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षीचा गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करा, तसेच गणेश विसर्जन घरगुती स्वरुपात करायला हवे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेवून याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

'कोविड-१९’ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. बैठकीत बोलताना त्यांनी लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधला. या बैठकीत त्यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी अँटिजेन किट घेण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले. ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

‘कोरोना’ रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णदर व मृत्यूदर तसेच प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, हवेली, खेड, मावळ, शिरुर, पुरंदर अशा रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी प्रशासकीय अधिकारी व आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे सांगून ‘जम्बो’ रुग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होणार असून यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी मदत होईल. नागरिकांनी देखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्यायला हवी, असे अजित पवार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details