पुणे :राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अनेक भाजप कार्यकर्त्यांची इच्छा होती. महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्ते वेळोवेळी तसे बोलूनच दाखवयाचे. त्यानंतर राज्यांमध्ये जाहिरातबाजी झाली. एकनाथ शिंदे हे लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे बॅनर राज्यात लागले. त्यानंतर भाजप शिवसेनेत नाराजी असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे राज्यातील विविध शहरात चर्चेला उधाण आले होते.
आता मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान :कार्यकर्त्यांच्या भावना सातत्याने पुढे येत आहेत. आज पुण्यातही गजानन एकबोटे यांनी मॉडर्न कॉलेजच्या एका कार्यक्रमात ‘आता मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान’ असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. गजानन एकबोटे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडवणीस यांनी हात जोडत चेहऱ्यावर आनंद व्यक्त केल्याचे दिसून येत आहेत.
फडणवीस भावी पंतप्रधान ? :मॉडर्न कॉलेजचे कार्याध्यक्ष गजानन एकबोट यांनी मॉडर्न कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना देवेंद्र फडवणीस यांचा उल्लेख जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा केला. साहेब आम्हाला आता भावी मुख्यमंत्री नको, तर पाच अंकी पद हवे आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आता मुख्यमंत्री नाही तर, भावी पंतप्रधान म्हणून कार्यकर्त्यांची पाहण्याची इच्छा असल्याचे एकबोटे यांच्या वक्तव्यावरुन लक्षात येते.
भाजपची संस्कृती पाहता मोदीनंतर पंतप्रधान पदी कोणाची वर्णी लागणार या विषयी भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु राहतात. मात्र, कोणत्याही राजकीय नेत्याला त्या पदावर हक्क सांगणे अवघड जाते. कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्याही मनात हाच विचार असेल, म्हणून त्यांनी हे शब्द उच्चारताच एकबोटेंना हात जोडले. त्यावरुन आता राजकीय चर्चांना भाजप कार्यकर्त्यांमध्ये उधाण आले आहे.