पुणे : भारताच्या जी 20 अध्यक्षतेअंतर्गत जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचा 17 जानेवारी 2023 रोजी पुण्यात समारोप झाला. या बैठकीला 18 सदस्य देश, 8 अतिथी देश आणि 8 आंतरराष्ट्रीय संघटनांचे 64 प्रतिनिधी उपस्थित होते. आज पहाटेच्या सुमारास या पाहुण्यांनी पुण्यातील शनिवार वाडा, लाल महाल, नाना वाडा आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली.
विविध ठिकाणी भेटी : पुण्यात जी 20 परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल होते. यंदाच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान भारताला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखळी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये विविध विषयांवर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. पुण्यात 16 आणि 17 तारखेला जेडबल्यू हॉटेल येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीनंतर परदेशी पाहुण्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत पुण्यातील शनिवार वाडा, लाल महाल व नाना वाडा भेट दिली.
परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सजावट :परदेशी पाहुणे येणार आहे म्हणून पहाटे पासूनच रस्ता बंद करण्यात आला होता. शनिवार वाडा तर काल पासूनच पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या बाहेर फुलांमध्ये अष्टविनायक गणपतीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. तसेच केरळी वाद्य दगडूशेठ गणपती मंदिराच्या बाहेर वाजविण्यात आले. मंदिराबाहेर आणि मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाने भारताच्या जी 20 अध्यक्षतेअंतर्गत 2023 वर्षासाठीच्या पायाभूत सुविधा कार्यक्रमावर चर्चा केली.