पुणे : जी-२० 'डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या देश विदेशातील प्रतिनिधींनी बैठकीसाठी पुण्यात हजेरी लावली आहे. यावेळी या प्रतिनिधींनी पालखी सोहळ्याला हजेरी लावत 'याची देही याची डोळा' महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवली. यावेळी काही प्रतिनिधींनी श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. तर काही प्रतिनिधींनी तुळस डोक्यावर घेऊन मनोभावे पूजा केली.
फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ उभारला होता मंडप :संत तुकाराम महाराज पादुका मंदिराजवळ फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे जी-२० प्रतिनिधींसाठी पालखी सोहळा अनुभवण्यासाठी मंडप उभारण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री चंदकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या आणि पुणे महानगर पालिकेच्यावतीने व्यवस्था करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.
ढोल ताशाच्या गजरात पालखी सोहळा :प्रारंभी ढोल ताशाच्या गजरात आणि तुळशीमाळा, वारकरी उपरणे, टोपी घालून प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी रस्त्यावरून दिंड्यांचे आगमन होऊ लागले. हाती भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीची रोपे, कपाळाला टिळा, टाळ, मृदंग, वीणा वादनात, 'राम कृष्ण हरी', 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' जयघोषात, अभंग गायनात, फुगडी, नर्तनात दंग वारकरी पाहून प्रतिनिधी वेगळ्याच अनुभवात दंग झाले. यावेळी काही प्रतिनिधींनी वारकऱ्यांकडून कपाळाला टिळा लावून घेतला.