पुणे - मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात सलाईनच्या बाटलीत चक्क शेवाळ आढळल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ माजली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीबांना कमी पैशात चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आली आहे. मात्र, याच जिल्हा रुग्णालयातील औषधांबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, आज (गुरुवारी) सकाळच्या सुमारास या रुग्णालयात सलाईन सुरु असताना आरएल (RL)कंपनीच्या सलाईनमध्ये शेवाळ असल्याचे रुग्णांच्या लक्षात आले. यानंतर नातेवाईकांनी ही गंभीर बाब रुग्णालयातील डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर रुग्णालयातील सर्व सलाईन थांबविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संपत केदारे यांनी दिली. तसेच जिल्हाचिकित्सकांनाही याबाबत माहिती देण्यात आली.