पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन ( Vikram Gokhale Passed Away ) झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांना धक्का बसला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आज संध्याकाळी ४ ते ६ बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होत. त्यानंतर 6 वाजून 20 मिनिटांनी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली - विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.आणि आज अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली - पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकरांनी गर्दी केली होती. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच कला क्षेत्रातील विविध मान्यवरांनी देखील यावेळी श्रद्धांजली वाहिली. समाज माध्यमांवर अनेक कालाकारांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
काही दिवसांपासून घशाच्या त्रासाने त्रस्त -विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे या कलाकारांबरोबर भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती. विक्रम गोखले यांना गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासाने त्रस्त होते. यामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला होता. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत होते.
विक्रम गोखले यांचा अल्पपरिचय - विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी झाला होता. त्यांनी चित्रपट मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केले होते. ते चित्रपटां बरोबरच नाटकांमध्येही अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित - स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारली. काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘अग्निहोत्र’ माहिलेकत त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका चांगली गाजली होती. आजही प्रेक्षकांच्या मनात ती भूमिका घर करुन आहे. अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं. विक्रम गोखले यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांना‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित - विक्रम गोखले यांना २०१३ मध्ये अनुमती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याबरोबरच त्यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. तसेच २०१७ मध्ये हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, २०१८ मध्ये पुलोत्सव सन्मानाने गौरवण्यात आले होते. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.