नारायणगाव (पुणे) - राज्यात महाविकास आघाडी सरकारने गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन योजना सुरू केली. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात ही थाळी मोफत देण्यात येत आहे. मात्र तिची संख्या मार्यदित आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर दररोज २०० ते ५०० लोकांना राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवभोजन देण्याची योजना नारायणगावात सुरू करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक गरीब आणि गरजू लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मोफत ७५ शिवभोजन थाळी ऐवजी २०० ते ५०० लोकांना राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवभोजन थाळी देण्यात येणार आहे, अशी माहिती नारायणगावचे सरपंच बाबू उर्फ योगेश पाटे यांनी दिली. शुक्रवारी नारायणगाव बसस्थानकासमोर हे शिवभोजन देण्याचा शुभारंभ झाला. प्रतिष्ठानचे संस्थापक सरपंच बाबू उर्फ योगेश पाटे यांच्या हस्ते गरिबांना थाळी देऊन उपक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी आशिष माळवदकर, आरिफ आतार, संतोष पाटे, संतोष दांगट, अनिल खैरे, राजेश बाप्ते, राजूशेठ पाटे, निलेश जाधव, मयूर विटे, आकाश कानसकर, जालिंदर खैर, ईश्वर पाटे आदी उपस्थित होते.