पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राजगुरुनगर शहर परिसरातील गावे दहा दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी राजगुरुनगर नगरपरिषद व जैन धर्मार्थ हॉस्पिटल यांच्या माध्यमातून 'डॉक्टर आपल्या दारी' हा उपक्रम सोमवारपासून सुरू केला आहे.
सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी... हेही वाचा-COVID-19 : भारताने गाठला चार हजार रुग्णांचा टप्पा; बळींची संख्याही शंभरहून अधिक..
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राजगुरुनगर नगर परिषदेच्या माध्यमातून जनजागृती व लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. याबरोबरच शहरातील व्यापारी आणि नगर परिषद प्रशासनाच्या आवाहनानुसार लाॅकडाऊन कोटेकारपणे पाळला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पोलीस, महसुल, आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहेत.
शहरातील नागरिकांचे आरोग्य ठणठणीत राहावे, करोना विषाणूची बाधा होऊ नये, त्यांच्यातील भीती दूर व्हावी. याबरोबरच इतर आजारांबाबतची तपासणी व्हावी यासाठी अखील भारतीय जैन संघटना, सकल जैन संघ, प्रमोद सुधाची चॅरिटेबल ट्रस्टच्या जैन धर्मार्थ रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या उपक्रमातून शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे, नगरअध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या उपस्थित झाली.
उद्यापासून शहरातील वार्ड निहाय नागरिकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. जैन धर्मार्थ दवाखान्याचे डॉ. सुरज वानखेडे, डॉ. पायल खोडके, डॉ. जया हे कार्डिया रुग्णवाहिकेद्वारे नागरिकांची तपासणी करणार आहेत.