दौंड - कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होउन झालेल्या अपघातात कारमधील वऱ्हाडी मंडळी दोन्ही वाहनांचा वेग कमी असल्याने सुदैवाने बचावली. या अपघाताच्या निमित्ताने अहमदनगर-दौंड-वासुंदे फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६०च्या दौंड शहरातून जाणाऱ्या भागातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कार आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक
शहरातील हॉटेल राजधानी ते रेल्वे मार्गावर कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. अपघात स्थळापासून जवळ रामकृष्ण लॉन्स या कार्यालयामध्ये आज एक विवाह सोहळा होता. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची कार रेल्वे उड्डाणपुलाकडून कार्यालयाकडे येत होती. कार्यालय रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असल्याने कार चालकाने कार कार्यालयाच्या बाजूला वळविली असता, हॉटेल राजधानी रस्त्याने येणाऱ्या ट्रॅक्टरने कारला धडक दिली. दोन्ही वाहनांचा वेग कमी असल्याने वाहनांची धडक होऊ नये म्हणून प्रयत्न केले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. कारचे नुकसान झाले आहे.
अपघात होण्याची शक्यता
अहमदनगर-दौंड-वासुंदे फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० विकसित करत असताना हा मार्ग दौंड शहरातील एचडीएफसी बँकेपासून ते वीज वितरण कंपनीच्या वसाहतीपर्यंत रस्त्याच्या दुभाजकासाठी आणलेले सिमेंटचे ठोकळे न बसवता रस्त्याच्या मधोमध अस्ताव्यस्त ठेवण्यात आले आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.