बारामती- इंदापूर तालुक्यातील आबाकरे वस्ती येथे धारदार हत्यारे बाळगल्याप्रकरणी छापा टाकत पोलिसांनी ४ ऊसतोड कामगारांना अटक केली. शक्ती उर्फ शक्तीमान उर्फ सकटया उर्फ चिटू विकास काळे, नितीन विकास काळे, जितेंद्र भारत चव्हाण,अर्जुन विकास काळे ( सर्व.रा.भांबूरे ता.कर्जत जि.अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर ऊसतोड मजूर कर्जत तालुक्यातील भांबुरे येथील असून मागील दोन महिन्यापासून ऊस तोडणीसाठी येथे आले होते.
२३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वय गुन्हे दाखल केले आहेत. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोन आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल
या आरोपींमधील शक्ती उर्फ शक्तीमान उर्फ सकटया उर्फ चिटू विकास काळे( रा. भांबूरे ता. कर्जत जि.अहमदनगर ) याने २३ डिसेंबर रोजी आपल्या २ महिन्यांच्या पोटच्या मुलीला नाकतोंड दाबून जीवे मारले होते. नंतर तो फरार झाला होता. इंदापूर पोलीस ठाण्यात त्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तर नितीन काळे याच्यावरही कर्जत पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.