पुणे- कांद्याला सध्या चांगला दर मिळत आहे. मात्र, आता या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना सोने सुरक्षित ठेवल्याप्रमाणे कांद्याचीही काळजी घ्यावी लागत आहे. कारण चोरट्यांनी आपला मोर्चा आता साठवणुकीत असलेल्या कांदा चाळीवर वळवल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील वरद विष्णु देसाई यांनी साठवणूक केलेल्या कांद्याच्या 58 पिशव्यांवर चार जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने डल्ला मारला. मात्र ओतुर पोलिसांनी बारा तासांत त्या टोळीच्या मुसक्या आवळून मुद्देमाल जप्त केला आहे.
जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील वरद विष्णू देसाई यांनी कांदा चाळीतील कांद्याच्या 58 पिशव्या भरुन ठेवल्या होत्या. शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कांदाचाळीचे कुलूप तोडून त्या पिशव्यांची चोरी केली. या चोरीबाबत वरद देसाई यांनी ओतुर पोलिसात तक्रार दिली. याची दखल घेत पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला आणि बारा तासांत चार जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसी खाक्या दाखवला असता, कांद्याची चोरी केल्याचे कबूली त्या चोरट्यांनी दिली.