दौंड (पुणे) -पाटस गावातील तामखडा येथे दोघांची तलवारीने वार करुन, दगडाने ठेचून निर्घृण हत्या रविवारी ( दि. 4 जुलै) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली होती. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना ताब्यात घेतले आहे. महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय 22 वर्षे, रा. पाटस, तामखडा ता.दौंड, जि.पुणे), महेश मारुती टुले (वय 20 वर्षे, रा. पाटस, तामखडा ता.दौंड जि.पुणे), युवराज रामदास शिंदे (वय 19 वर्षे, रा.गिरीम, मदनेवस्ती, ता.दौंड, जि.पुणे) व गहिनीनाथ बबन माने (वय 19 वर्षे, रा. गिरीम, राघोबानगर, ता. दौंड, जि.पुणे), असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील पाटस गावातील तामखडा येथील भानोबा मंदिरासमोर महेश उर्फ मन्या भागवत याने शिवम शितकल यास फोनवरुन शिव्या देवून तामखडा येथे बोलविले. त्यानंतर शिवम संतोष शितकल (वय 23 वर्षे) व गणेश रमेश माकर (वय 23 वर्षे, दोघे रा.पाटस, अंबिकानगर ता. दौंड, जि.पुणे) हे शिव्या का दिल्या याचा जाब विचारण्यासाठी गेले होते. त्यावेळी महेश उर्फ मन्या संजय भागवत, महेश मारुती टुले व त्यांच्यासोबत आलेल्या 4 ते 5 साथीदारांनी शिवम व गणेश या दोघांना तलवार, काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांचे डोके दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी भा.दं.वि.चे कलम 302, 143, 147, 148, 149, 504, 506 आर्म अॅक्टचे कलम 4 व 25 प्रमाणे खुनाचा गुन्हा यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.