माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांना उच्च न्यायालयाकडून अंतिम जामीन मंजूर - final bail to Dilip Mohite Patil
मराठा आरक्षण मोर्चातील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर ठपका ठेवून गुन्हा दाखल केला होता. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व अंतिम जामीन मंजूर केला आहे.
पुणे- चाकण येथील मराठा आरक्षण मोर्चास हिंसक वळण लागले होते. त्यावेळी या आंदोलनातील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर ठपका ठेवून गुन्हा दाखल केला होता. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व अंतिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता मोहिते पाटील यांची अटक टळली आहे.
चाकण हिंसाचार प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोहितेपाटलांवर ठपका ठेवत गुन्हे दाखल केले होते. याबाबत अटकपूर्व जामीन अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश रेवती ढेरे यांच्या पुढे न्यायालयात दिलीप मोहिते पाटील यांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. त्यावेळी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करून त्यावर २१ ऑगस्टला सुनावणी ठेवली होती. ती सुनावणी बुधवारी पार पडली. अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुरीनंतर बुधवारी अंतिम अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती ढेरे यांनी मंजूर केला.