पुणे :केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते शनिवारी चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन (Inauguration of Chandni Chowk Bridge) होणार आहे. मात्र, याबाबत भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former BJP MLA Medha Kulkarni) यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा जाहीर निषेध केला आहे. मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित सध्याचे नेते माझ्यासारख्यांचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
कोथरूडमधील कार्यक्रमाबाबत दु:ख : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मला पक्षाने डावल्याबाबत मी कधीच जाहीर वाच्यता केलेली नाही. मला विश्वासात न घेता अचानक निर्णय घेण्यात आल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. मात्र, आता माझ्या मनात दु:ख राहत नाही. मला वाटले तुमच्याशी बोलावे. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पाहिली त्याबाबत अतिशय दु:ख झाल्याची खंत देखील कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
अस्तित्वच पुसून टाकण्याचा प्रयत्न : चांदणी चौकाचे संपूर्ण श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना जाते. पण ही बाब त्यांच्यापर्यंत कोणी नेली? काही वर्षांपूर्वी, एका कार्यक्रमात जाहीर भाषणात स्वत: गडकरी म्हणाले होते की, "मी तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून हा मुद्दा उचलला होता". असे अनेक संदर्भ देता येतील. 'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. पण कोथरूडचे सध्याचे नेते सगळे श्रेय स्वतःचे आहे, असे वागत आहेत. माझ्यासारख्यांचे अस्तित्वच पुसून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? असे देखील त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.
स्थानिकांना मी नको आहे : मध्येच आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शाहाजी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणाचे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असूनही मला पास देण्यात आला नाही. साध्या कोथरूडच्या नेत्यांना मी अपेक्षित नसेन, तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्ष मी या गोष्टी सहन करीत आले आहे. वर्षानुवर्षे मला याचा त्रास होत आहे. त्यावेळी वरिष्ठांसमोर सर्व गोष्टी मांडल्या होत्या असे देखील कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.