मुंबई -टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज १५ वी अटक केली आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. त्यांना मुंबईला आणण्यात येत असून उद्या शुक्रवार २५ डिसेंबरला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या (सीआययू) पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. पार्थो दासगुप्ता यांना पुण्यातल्या ग्रामीण भागातून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत १५ जणांना अटक केली असून टीआरपी फेरफार प्रकरणी तपास सुरू आहे.
मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
टीव्ही वाहिन्यांच्या टेलीव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) संदर्भातील घोटाळा मुंबई पोलिसांनी समोर आणला आहे. यात देशातील मोठ्या न्यूज चॅनलची नावे सुद्धा उघड झाली आहेत. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले की, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ही कंपनी भारतात टीव्ही चॅनल्स, टीव्ही प्रोग्रॅमचे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट काढणारी एकमेव कंपनी आहे.
सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली बार्क काम करत असून टीआरपी मोजण्यासाठी या कंपनीकडून भारतातील ठराविक घरांमध्ये बॅरोमीटर नावाचे यंत्र लावण्यात येते. मुंबईत 2 हजार बॅरोमीटर लावण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र, या कंपनीच्यावतीने हंसा रिसर्च ग्रुप या एजन्सीला हे कंत्राट देण्यात आले होते. यात फेरफार झाल्याचा आरोप आहे. टीआरपीसाठी निवड करण्यात आलेल्या कुटुंबीयांना काही ठराविक काळात एखादीच वाहिनी सुरू करून ठेवण्यास सांगण्यात येत होते. त्यासाठी त्यांना पैसे दिले जात असल्याचे तपासात पुढे आले असून मुंबई पोलीस तपास करत आहेत.