पुणे - शहरात आतापर्यंत कोरोना विषाणूचे 9 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी मेडिकलमध्ये एकच गर्दी केली. नेमका याचाच फायदा मेडिकल व्यावसायिकांनी उचलत ग्राहकांची लूट सुरू केली आहे. ग्राहकांची लूट करणाऱ्या 4 औषध विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली असून पुढील आदेश येईपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील कोथरूड, कर्वेनगर, गोखले नगर आणि म्हाळुंगे येथील मेडीकल दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. कोथरूडमधील मेट्रो मेडिकल, गोखले नगरमधील ओम केमिस्ट या दुकानात मास्कची विक्री चढ्या दराने होत होती. तर दुसरीकडे म्हाळुंगे येथील महालक्ष्मी मेडिकल आणि कोथरूड येथील न्यु पूजा केमिस्ट या दुकानात बोगस सॅनिटायझरची विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.