पुणे - अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासोबतच सरसकट कर्जमाफीचेही आश्वासन देण्यात आले. आता खुद्द उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्याने या आश्वासनांची लवकर पूर्तता व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळावा...शेतकऱ्यांची मागणी - farmers demands for instant relief
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासोबतच सरसकट कर्जमाफीचे आश्वासन शिवसेनेमार्फत देण्यात आले होते. आता खुद्द उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्याने या आश्वासनांची लवकर पूर्तता व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, सोयाबीन, द्राक्ष, डाळिंब, कांदे,आदी पिके भूई सपाट झाली. निवडणुकीच्या निकालानंतर वेळेत सरकार स्थापन झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यपालांकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदत देखील जाहीर करण्यात आली. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे नव्या सरकारने लवकरात लवकर मदत पुरवण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी, पिंपळी, दंड वाडी, काटेवाडी, सुपा, आदी भागात अवकाळी पावसाने नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहाणी करुन पंचनामे केले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. यामुळे नवीन सरकारने तत्काळ रक्कम खात्यावर जमा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.