पुणे- मान्सूनची चाहूल लागताच ऑस्ट्रेलियातील फ्लेमिंगो पक्षांचे थवे जून्नर तालुक्यातील मढ खुबी-खिरेश्वरसह पिंपळगाव जोगा धरण परिसरात दाखल होऊ लागले आहेत. तिन्ही ऋतुंमध्ये येथील वातावरण अल्हाददायक असल्याने फ्लेमिंगो पक्षी प्रतिवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी भेट देतात. त्यामुळे हे स्थळ आता पक्षीप्रेमींना साद घालत आहे.
जून्नरमध्ये 'फ्लेमिंगों'चे आगमन; पक्षीप्रेमींना साद घालू लागली जलाशये.. - madh khubi khireshwar
मान्सूनची चाहूल लागताच ऑस्ट्रेलियातील फ्लेमिंगो पक्षांनी मढ खुबी खिरेश्वर व पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशयात आगमन केले आहे. त्यामुळे हे स्थळ आता पक्षीप्रेमींना साद घालत आहे.
जुन्नर तालुक्याचा उत्तर व पश्चिम भाग हा सह्याद्री पर्वत रांगेनी व्यापला आहे. याच डोंगरांच्या कुशीत पिंपळगाव जोगा जलाशयाने एक वेगळे आकर्षण निर्माण केले आहे. विस्तीर्ण पसरलेला जलाशयाचा परिसर आता निसर्गाच्या विविध रंगाने फुलून गेला आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तीनही ऋतुंमध्ये परिसरातील वातावरण अल्हाददायक असते. याच वातावरणाचा आनंद घेण्यासाठी फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी दाखल झाले आहेत.
प्रति वर्षी २०० ते २५० फ्लेमिंगो पक्षांचा संघटीत थवा जलाशय परिसरात दाखल होतो. जलाशयावर मुक्तपणे विहार करणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांचे दृश्य विलोभनीय दिसते. परिसरातील वातावरण पोषक मिळाल्याने आता त्यांचा मुक्काम अजून दोन महिने या परिसरात असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी येथील नागरिक सज्ज झाले आहेत.