पुणे- कोरोनाच्या भीतीने पुण्यात अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. अशा स्थितीत महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, इतर शहारांतील विद्यार्थी, पोलिसांसाठी वंदेमातरम् संघटना, सरहद काश्मिरी विद्यार्थी संघटना, श्री गुरु गौतममुनी मेडीकल अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या तर्फे मोफत भोजन सेवा शहरातील विविध ठिकाणी सुरु करण्यात आली आहे.
संपूर्ण देश कोरोना विरुध्दची लढाई संयमाने आणि स्वयंशिस्तीने लढत आहे. दुकाने, हॉटेल्स उस्फूर्तपणे बंद आहेत. पण, या परिस्थितीत अत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर पडलेले नागरिक, हातावर पोट असलेले समाजबांधव, इतर शहरातून आलेले विद्यार्थी आणि मुख्यत्वे आपले स्वच्छता सैनिक यांचे खाण्याचे हाल होऊ नयेत. यासाठी पुढील काही दिवस दररोज पाच हजार गरजूंना दुपारी साडेबारा ते दोन तसेच संध्याकाळी साडेसात ते नऊ जेवणासाठी फुड पॅकेट्स देण्यात येणार आहेत, अशी माहिती वंदे मातरम संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे यांनी दिली.