बारामती : बारामती येथील गणेश जाधव यांच्या गोळीबाराच्या घटनेतील पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलिसांनी ( Pune Rural Police ) संयुक्त कारवाई करत ताब्यात घेत अटक केली. तुषार चंद्रकांत भोसले राहणार रुई पाटी, बारामती, सूरज राजू काशिद, राहणार सावळ, बारामती, शुभम विकास राजपुरे राहणार मुर्टीमोढवे, तालुका बारामती, तेजस रतीलाल कर्चे राहणार सूर्यनगरी, बारामती, विकर्म लालासाहेब बोबडे राहणार रुईसावळ, बारामती या पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पथक घेत होते संशयितांचा शोध :पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी या गोळीबाराच्या घटनेनंतर तपासाच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अशोक शेळके, तालुका पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे, यांच्या नेतृत्वाखाली नेताजी गंधारे, सचिन काळे, अभिजित सावंत, अमित सिदपाटील, सचिन घाडगे, स्वप्निल अहिवळे, रामदास बाबर, राजू मोमीन, अजित भुजबळ, विजय कांचन, मंगेश थिगळे, नीलेश शिंदे, अमोल शेंडगे, बाळासाहेब खडके, प्राण येवले, धीरज जाधव, दगडू वीरकर यांची तीन पथके, योगेश लंगुटे यांच्या नेतृत्वाखाली राम कानगुडे, दडस पाटील, नरुटे, दराडे यांचे पथकही संशयितांचा शोध घेत होते.
13 गुन्हे दाखल असल्याची माहिती : तालुका पोलिसांनी तुषार भोसले व सूरज काशिद यांना पकडले. उर्वरित संशयितांचा शोध घेताना मुख्य संशयित शुभम राजपुरे पिंपरी चिंचवडच्या एका लॉजवर असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने शुभम, तेजस कर्चे व विक्रम बोबडे यांना ताब्यात घेतले. यातील शुभम राजपुरे याच्या विरोधात खून, खूनाचाप्रयत्न, जबरी चोरी, खंडणी अशा स्वरुपाचे 13 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्ह्यात 135 कारवाया :पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यात चार दिवसात अवैध व्यवसायाविरोधात ग्रामीण पोलिसांनी 135 कारवाया केल्या असून यात साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जीवे मारण्यासाठी कोयत्याने वार : पर्वा भिगवन रस्त्यावर सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली होती. रिलायन्स पेट्रोल पंप येथे शुभम राजपुरे, तुषार भोसले यांनी सात ते आठ साथीदारांसह हातात कोयता घेऊन येत बारामतीचा मी बाप आहे, असे म्हणत ऋत्विक जीवन मुळीक, गणेश जाधव, अतुल भोलानकर यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करून बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत जाधव याच्या पोटाच्या डाव्या बाजूला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणी 2 पथक तैनात करण्यात आले होते. यातील एका पथकाने तुषार भोसले, सूरज काशिद यांना पकडले. तर शुभम राजपुरे हा पिंपरी चिंचवड हद्दीत एका लॉजवर थांबला होता. तेथून राजपुरे याच्यासह कर्चे व बोबडे यांना ताब्यात घेण्यात आले.