महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वतःचे लग्न असल्यामुळे 'तो' आज गावी जाणार होता, पण त्याआधीच मृत्यूने गाठले - आग

मृत्यू झालेल्या राकेश मेघवाल (वय २०, मेवाड, राजस्थान ) या तरुणाचे येत्या १७ तारखेला लग्न होते. त्याकरीता तो आज गावी जाणार होता. त्याचे तिकीटही बुक झाले होते.

राजयोग साडी सेंटर या दुकानाला भीषण आग

By

Published : May 9, 2019, 5:38 PM IST

पुणे- पुण्यात आज(गुरुवार) राजयोग साडी सेंटर या दुकानाला भीषण आग लागली होती. यात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यात मृत्यू झालेल्या राकेश मेघवाल (वय २०, मेवाड, राजस्थान ) या तरुणाचे येत्या १७ तारखेला लग्न होते. त्याकरीता तो आज गावी जाणार होता. त्याचे तिकीटही बुक झाले होते. पण, त्यापूर्वीच मृत्यूने त्याला गाठले. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आज पहाटेच्या सुमारास सासवड रस्त्यावरील राजयोग साडी सेंटर या दुकानाला भीषण आग लागली होती. तेव्हा पाच कामगार दुकानात झोपले होते. दुकान बाहेरून बंद असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. यातील एकाने मॅनेजरला फोन करून आग लागल्याचे सांगितलेही, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाचही जणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

आपल्या मित्राच्या आठवणी सांगताना शेजारच्या दुकानात काम करणाऱ्या मारुती घाडगे याला गहिवरून आले होते. तो म्हणाला, आम्ही शेजारी शेजारी काम करत असल्यामुळे राकेश माझा चांगला मित्र होता. १७ तारखेला त्याचे लग्न होणार होते. लग्नाची संपूर्ण खरेदीही त्याने केली होती. आज (गुरुवार) चार वाजता तो गावी जाणार होता. एरवी कधीही दुकानात न झोपणारा राकेश पहिल्यांदाच दुकानात झोपला होता. परंतू त्याअगोदरच नियतीने त्याला गाठले.

दरम्यान, आगीच्या घटनेनंतर संपूर्ण उरुळी देवाची परिसरात शोककळा पसरली आहे. एरवी गजबजलेली बाजारपेठ आज शांत होती. व्यापाऱ्यांनीही मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून दुकाने बंद ठेवली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details