पुणे- मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील लोहमार्ग बांधणीला प्रारंभ झाला आहे. या वर्षअखेरीपर्यंत पिंपरी-चिंचवडपासून खडकीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोच्यावतीने देण्यात आली आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील लोहमार्ग बांधणीला प्रारंभ; वर्षअखेरीपर्यंत मेट्रो `वर यासंदर्भात महामेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बांधण्यात येणाऱ्या 30 किलोमीटरच्या मेट्रो मार्गापैकी पिंपरी-चिंचवडमधील 7 आणि पुण्यातील दीड किलोमीटरच्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
त्यापैकी पिंपरी चिंचवड ते खडकीदरम्यान 7 किलोमीटरच्या लोहमार्ग बांधणीला प्रारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले रूळ नागपूर येथून आणण्यात आले आहेत. त्यामुळे या वर्षअखेरीपर्यंत पहिल्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाची चाचणी करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
त्याप्रमाणेच पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 3 हजार टन वजनाचे रूळ स्विझरलँड येथील एका कंपनीकडून आयात करण्यात येणार आहेत. या कंपनीचा कारखाना सायबेरीयामध्ये असून, नागपूर मेट्रोसाठीदेखील याच कंपनीने रुळांचा पुरवठा केला होता. तसेच पुणे आणि नागपूर मेट्रोसाठी 110 युटीएस हेडहार्डन दर्जाचे रूळ वापरण्यात येणार असल्यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या दर्जामध्ये वाढ होईल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.