महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पहिला तक्रार अर्ज दाखल - Pooja Chavan case complaint Swarada Bapat

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता पहिली तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा आणि भाजपच्या पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी आज वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणासंबंधी पहिला तक्रार दाखल केली.

protest
विरोध

By

Published : Feb 25, 2021, 10:59 PM IST

पुणे -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता पहिली तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा आणि भाजपच्या पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी आज वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणासंबंधी पहिला तक्रार अर्ज दाखल केला. तत्पुर्वी भाजप युवा मोर्चाच्या वतीने वानवडी पोलीस स्टेशन समोर मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात, तसेच राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा -पुणे विभागात 5 लाख 84 हजार 922 जणांची कोरोनावर मात

दरम्यान, याप्रकरणी कोणाचीही तक्रार नसल्याने त्याचा फायदा घेत पोलीस या प्रकरणाचा तपास करण्याचे टाळत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुमोटो तक्रार दाखल करण्याची गरज होती. मात्र, आता जर तक्रार नसेल, तर अशा गंभीर प्रकारात आरोपीवर कारवाई व्हावी यासाठी सुजाण नागरिक म्हणून तक्रार दाखल करत असल्याचे स्वरदा बापट यांनी सांगितले.

एकंदरीतच विरोधी पक्ष भाजपने हे प्रकरण लावून धरले असून भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत संजय राठोड हे हत्यारे असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या प्रकारणात कोणीही तक्रार केली नसल्याचे कारण देत पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप करून संजय राठोड यांच्या दावणीला बांधले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एकंदरीतच या प्रकरणातील ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या विरुद्ध हे षडयंत्र असल्याचे आणि आपली नाहक बदनामी केली जात असल्याचे म्हटले होते. आता भाजपच्या स्वरदा बापट यांनी या प्रकरणा तक्रार दिल्याने संजय राठोड यांच्या अडचण आणखी वाढणार आहेत.

घटनेच्या कलम 306 व 107 प्रमाणे संजय राठोड यांच्यावर एफआयआर दाखल करावा, असा अर्ज स्वरदा बापट यांनी केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात ज्या 12 ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमांमधून व्हायरल झाल्या, त्यामध्ये पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर संबंधित पुरावे नष्ट करण्याचे आदेश अरुण राठोड या युवकाला दिले आहेत. या ऑडिओ क्लिपमधून पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे संबंध होते हे समजते. त्यातून सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून किंवा प्रेमभंग किंवा राठोड यांच्याकडून होणाऱ्या दबावामुळे पूजा चव्हाण हिला आत्महत्येस प्रेरित केल्याचे निष्पन्न होते आहे आणि सदरील पुरावे नष्ट करण्यास एका युवकाला (अरुण राठोड) याला आदेश दिल्याचेही निष्पन्न होते आहे. त्यामुळे, याप्रकरणी एफआयआर नोंद करून आणि पुढील कारवाईबाबत लवकरात लवकर आदेश काढावेत आणि आरोपीला अटक करावी, अशी मागणी एक सुजाण नागरिक म्हणून करीत असल्याचे स्वरदा बापट यांनी त्यांच्या तक्रार अर्जात म्हटले.

हेही वाचा -चिमुकल्यांनी केले हजारो देशी वृक्षांचे बी गोळा; बीज आणि सीड बॉल रोपणासाठी होणार फायदा

ABOUT THE AUTHOR

...view details