जुन्नर (पुणे) - तालुक्यातील धनगरवाडी गावात 65 वर्षीय महिलेला कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन दिवसांनी बुरशीजन्य आजार म्युकोरमायकोसिसचा संसर्ग झाल्याची घटनासमोर आली आहे. बुधवारी सकाळी नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या अथर्व नेत्रालयात महिला डोळे तपासणीसाठी आली असता ही बाब निदर्शनास आली आहे.
लवकर उपचार झाले तर हा आजार बरा होतो -
कोरोनानंतर मधुमेह असणाऱ्यांना या आजाराची लागण होते. यात नाकात व डोळ्यांमध्ये बुरशी तयार होऊन डोळे लाल होतात. सुरुवातीच्या काळात यावर उपचार झाले तर हा आजार बरा होतो. परंतु, दुर्लक्ष केल्यास या आजाराची गंभीरता वाढत जाऊन ही बुरशी मेंदूपर्यंत पोहोचते व रुग्णाची परिस्थिती गंभीर होत जाते. त्यामुळे कोरोनानंतर डोळे व नाकासंबंधी काही तक्रारी आढळल्यास तात्काळ संबंधित तज्ज्ञांना दाखवणे गरजेचे आहे, असे डॉक्टर मनोहर डोळे, नेत्र रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर संदीप डोळे यांनी सांगितले.