महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आधी केंद्राला टॅक्स कमी करायला सांगा, मग आम्ही विचार करू' - पुणे अजित पवार बातमी

भाजपकडून विनाकारण गैरसमज पसरवण्याचे काम सुरु असून सरकारने पन्नास टक्के वीजबिल माफ केले आहे. तसेच त्यावरील व्याज आणि दंडदेखील माफ केले आहे. मात्र, पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे वीजबिल आंदोलन करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

First ask Center to reduce taxes, then we will consider said ajit pawar in pune
'आधी केंद्राला टॅक्स कमी करायला सांगा, मग आम्ही विचार करू'

By

Published : Feb 5, 2021, 12:39 PM IST

Updated : Feb 5, 2021, 12:55 PM IST

पुणे - पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राज्य सरकारने टॅक्स कमी करावा, असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणीसांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी समाचार घेतला. आधी केंद्राला टॅक्स कमी करायला सांगा, मग आम्ही विचार करू, असा टोला त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तसेच भाजपकडून विनाकारण गैरसमज पसरवण्याचे काम सुरु असून सरकारने पन्नास टक्के वीजबिल माफ केले आहे. तसेच त्यावरील व्याज आणि दंडदेखील माफ केले आहे. मात्र, पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे वीजबिल आंदोलन करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवारांची प्रतिक्रिया

फडणीसांच्या वक्तव्याचा घेतला समाचार -

पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक वॅट हा राज्य सरकारकडून आकारला जातो आहे. पेट्रोल आणि डिझेल अजूनही जीएसटीच्या अंतर्गत आले नसल्याने दर वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने आवश्यक ती पावले उचलण्याची गरज असून जनतेला दिलासा मिळेल, असे फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या आरोपाला उत्तर देताना, आधी केंद्राला टॅक्स कमी करायला सांगा, मग आम्ही विचार करू, अजित पवार यांनी म्हटले.

नाना पटोलेचा राजीनामा कॉग्रेसचा अंतर्गत प्रश्न -

पटोले यांनी राजीनामा दिला आहे. तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, आघाडीत किमान समान कार्यक्रमानुसारच निर्णय होतील. नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या सत्रानंतर राजीनामा द्यायला हवा होता, असे वाटत होते. मात्र, त्यांच्या पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे. पटोले यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. पटोले यांचा राजीनामा अनपेक्षित नाही. गेली काही दिवस यावर चर्चा सुरू होती, असेही अजित पवार म्हणाले.

निलेश राणेंना फार महत्त्व द्यायची गरज नाही -

निलेश राणे वारंवार करत असलेल्या टीकेवर बोलताना, त्यांना फार महत्त्व द्यायची गरज नाही. कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत, असे म्हणत अजित पवारांनी निलेश राणेंवर निशाणा साधला. निलेश राणे यांना मोठे का करू, असेही ते म्हणाले.

शरजील उस्मानी चुकीचे बोलला त्याला थांबायला हवे होते -

एल्गार परिषदेमध्ये उस्मानीने केलेले वक्तव्य अजिबात योग्य नाही. त्यावेळी तिथे न्यायाधीश राहिलेल्या माणसाने त्याचे भाषण थांबवायला हवे होते, असे प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. तसेच शरजीलवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत तपास महाराष्ट्र पोलीस करत आहेत, असे ते म्हणाले.

महापालिका निवडणुकीतही यश मिळेल -

पुणे महापालिका निवडणुकीबाबत बोलताना, ही निवडणूक आम्ही गनिमी काव्याने लढणार असल्याचे अजित पवार म्हणाले. महापालिका निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये, यासाठी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीतही यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी आंदोलन आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका -

आंदोलनाच्या ठिकाणी खीळे ठोकणे सरकारला शोभत नाही. शेतकरी हे पाकिस्तान किंवा चीनमधून आलेले नाही. ते अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत असताना तुम्ही रस्त्यावर खीळे ठोकता, हे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसेच क्रिकेटपटूंनी आणि अभिनेत्यांनी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. याबाबत बोलताना, कोण काय बोलते हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलनावर बसले असताना त्यावेळी मत मांडायला त्यांना कोणी थांबवले होते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राज्यपालांनी अंत पाहू नये -

विधान परिषदेच्या आमदार नेमणुकींबाबत राज्यपालांनी अंत पाहू नये, असे अजित पवार यांनी म्हटले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी प्रस्ताव दिला असून राज्यपालांची वेळ घेऊन चर्चा करू, असेही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा - शिवसेना भाजपा आमने-सामने; इंधन दरवाढी विरोधात शिवसेना तर वीज बिला विरोधात भाजपा रस्त्यावर

Last Updated : Feb 5, 2021, 12:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details