पुणे - शहरालगत असणाऱ्या पिंपरी-चिंचवडजवळील मोरवाडी येथील एका ग्लास कंपनीत मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. कंपनीचे शटर बाहेरून बंद असल्याने कामगारांना बाहेर पडता येत नव्हते. कामगारांनी प्रसंगावधान राखत वेळीच अग्निशमन दलाला याची माहिती दिल्याने मोठा अनर्थ टळला. महावितरणाकडे वारंवार तक्रार देऊनही त्याची दखल घेतली नाही. यांमुळे कामगारांना स्वतःच्या जीवाशी सामना करावा लागला आहे.
अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे वाचला कामगारांचा जीव, मोरवाडीतील 'मोहम्मदिया आर्ट ग्लास' कंपनीतील घटना
पिंपरी-चिंचवड जवळील मोरवाडी येथील 'मोहम्मदिया आर्ट ग्लास कंपनीत' शॉर्टसर्किट होऊन मीटरमध्ये आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. महावितरणाच्या अकार्यक्षमतेमुळे कामगारांचा जीव धोक्यात.
मोरवाडी येथे रात्री सव्वा अकरा वाजता 'मोहम्मदिया आर्ट ग्लास' येथे शॉर्टसर्किट होऊन मीटरमध्ये आग लागली होती. आग लागली तेव्हा कंपनीमध्ये चार कामगार झोपले होते. मीटरमधून धूर निघत असल्याचे एकाने पाहिले. परंतु बाहेरून शटर बंद असल्याने आणि पाऊस सुरू असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. शॉर्टसर्किटमुळे लोखंडी शटर मध्ये विजेचा प्रवाह उतरला होता, म्हणून कोणी शटरकडे गेले नाही. आत झोपलेल्या कामगारांपैकी इरफान शेख याने प्रसंगावधान राखत फोनद्वारे अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दलाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महावितरणला फोन करून वीजप्रवाह बंद करण्यास सांगितला आणि आतील कामगारांना आवाज देऊन शटर उघडण्यास सांगितले. कामगारांनी शटरमध्ये करंट उतरल्याचे सांगितले, मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना धिर देत वीजप्रवाह खंडित केल्याचे सांगितले. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास कामगारांनी सुटकेचा निश्वास सोडला.