पुणे - सैन्यदलात नोकरीला असलेल्या जवानाने बारामतीतील अल्पवयीन मुलीशी बळजबरीने विवाह केला. याप्रकरणी त्याच्यासह पीडितेचे वडील व आजीविरोधात शहर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या दुसऱया फिर्यादीवरुन सैन्यदलातील या जवानाविरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार अन्य एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीमंत साबू काळेल (वय ३२, रा. हर्नाळ, ता. तिकोट, जि. विजापूर, कर्नाटक) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. अन्य दोन आरोपींमध्ये पीडितेचे वडील व आजी (आईची आई) यांचा समावेश आहे. यातील काळेल याला अटक करण्यात आली आहे. सैन्यदलात तो बेळगाव येथे कार्यरत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे यांनी दिली.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पीडिता ही अल्पवयीन आहे, हे माहिती असतानाही त्यांनी तिच्या वडील व आजीशी संधान साधत तिच्याशी लग्नाची मागणी केली. वडील व आजीने लग्न जमवले. या लग्नाला पीडितेने व तिच्या आईने विरोध केला. परंतु, त्यांनी त्यांचे ऐकून घेतले नाही. पीडितेने आईच्या मोबाईलवरून आरोपीशी संपर्क साधत मी अवघी १५ वर्षाची असून दहावीत शिक्षण घेते आहे. मला पुढे आणखी शिकायचे आहे, तुम्ही सैन्यदलात देशाचे रक्षण करता तसे माझेही संरक्षण करा, अशी मागणी केली. परंतु, त्याने ती साफ धुडकावत २२ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी साडेसात वाजता हर्नाळ येथील महादेव मंदिरात तिच्याशी बालविवाह केला. सैन्यदलातील आरोपी, वडील व आजीच्या दबावामुळे इच्छेविरोधात हा विवाह करावा लागला असल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.