अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल.. - गिरीवन प्रोजेक्ट कंपनी फसवणूक
'गिरीवन प्रोजेक्ट' या कंपनीला सरकारची मान्यता असल्याचा दावा करून प्लॉटधारकांना आकर्षित करण्यासाठी खोटी आश्वासने देऊन मुळशी तालुक्यातील डोंगरगाव आणि होतले येथे बेकायदेशीर जमीन विकल्याचा आरोप विक्रम गोखले यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे - चौदा खातेदारांची 97 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 'गिरीवन प्रोजेक्ट' या कंपनीला सरकारची मान्यता असल्याचा दावा करून प्लॉटधारकांना आकर्षित करण्यासाठी खोटी आश्वासने देऊन मुळशी तालुक्यातील डोंगरगाव आणि होतले येथे बेकायदेशीर जमीन विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी जयंत प्रभाकर बहिरट (वय 57) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार विक्रम गोखले यांच्यासह अॅड. जयंत रामभाऊ म्हाळगी आणि सुजाता जयंत म्हाळगी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयंत म्हाळगी आणि सुजाता म्हाळगी यांनी काही वर्षांपूर्वी सुजाता फार्म प्रा. लि. कंपनी स्थापन केली. त्यांनतर त्यांनी गिरीवन प्रोजेक्ट या कंपनीची स्थापना केली. विक्रम गोखले हे या कंपनीचे अध्यक्ष आहेत. हा प्रोजेक्ट सरकारमान्य असल्याचा दावा करून अनेक प्लॉटधारकांना आकर्षित करण्यात आले. 2016 मध्ये तक्रारदारानी प्लॉट खरेदी केला होता. हा प्लॉट सरकारी मोजणी करून देत नसल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जही केला होता. त्यांच्याकडून विनाहरकत मोजण्या करून घ्याव्यात, असे आदेश असतानाही संचालक हरकती घेत आहेत. प्लॉट मोजणी करून मिळाल्यानंतरही फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. तसेच गिरीवन हा प्रोजेक्ट खासगी हिल स्टेशन असल्याचे सांगून फसविल्याचे तक्रारदारानी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.