पुणे :आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी काही वारकर्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यावरून समस्त वारकरी समाजाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त वारकरी समाजाची माफी मागावी, अन्यथा पंढरपूर येथील शासकीय पूजा होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. या प्रकरणी आता सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये संतोष शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तुषार दामगुडे यांनी फिर्याद दिली आहे.
'संतोष शिंदे यांचे विधान दंगल घडवून आणणारे' : या प्रकरणी पोलीस म्हणाले की, संतोष शिंदे यांचे हे विधान दंगल घडवून आणणारे आहे. तसेच लाखों भाविकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारे आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या तक्रारीच्या आधारे संतोष शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे सहकारनगर पोलिसांनी सांगितले.