पुणे FIR Against Maruti Navale :सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये अपहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती निवृत्ती नवले यांच्यावर तब्बल 116 कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2019 ते जून 2022 या कालावधी दरम्यान कोंढवा इथल्या टिळेकर नगरमध्ये असलेल्या सिंहगड सिटी स्कूलमध्ये घडल्याचं पोलिसांनी म्हटले.
कर्मचाऱ्यांचा भरला नाही भविष्य निर्वाह निधी :याप्रकरणी राहुल एकनाथ कोकाटे (वय 51, रा. क्रिमसन क्रिस्ट सोसायटी, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. राहुल कोकाटे हे भविष्य निर्वाह निधी विभागात अधिकारी आहेत. मारुती नवले हे सिंहगड सिटी स्कूलचे संस्थापक आहेत. या शाळेमधील साधारण 116 कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर 2019 ते जून 2022 पर्यंतच्या मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात करण्यात आलेली आहे. 74 लाख 68 हजार 636 रुपयांची एकूण कपात करुन घेतलेली होती. परंतु, यातील फक्त तीन लाख 75 हजार 774 रुपयांचीच रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात आली.