महाराष्ट्र

maharashtra

गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

By

Published : Jan 5, 2021, 1:14 PM IST

भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांविरोधात पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण करत खंडणी उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

FIR against former minister girish Mahajan in pune
गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे -जळगाव येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे संचालक विजय पाटील (वय 52) यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करत खंडणी उकळल्याप्रकरणी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांविरोधात पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय पाटील यांनी फिर्याद दिली असून गिरीश महाजन, निलेश भोईटे, तानाजी भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी विजय पाटील हे वकील आहेत. ते जळगाव येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या संचालक पदाचे काम देखील पाहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पुण्यामध्ये संस्थेचे कागदपत्र देण्यासाठी आरोपींनी त्यांना बोलावून घेतले. पुण्यात आल्यानंतर त्यांना जबरदस्तीने एका गाडीमध्ये बसवत त्यांचे अपहरण केले. त्यानंतर सदाशिव पेठेतील एका फ्लॅटमध्ये हात पाय बांधलेल्या अवस्थेत त्यांना डांबून ठेवले. आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली आणि त्यांच्या गळ्याला चाकू लावून राजीनाम्यासाठी दबाव टाकला.

विजय पाटील यांच्यासोबत आलेल्या इतर सहकाऱ्यांनाही आरोपींनी डांबून ठेवले. तसेच मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पाच लाख रुपये उकळले. आरोपींनी फिर्यादी संचालक असलेल्या जळगाव येथील संस्थेत घुसून तोडफोड केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details