पुणे : Fight Against Dowry : आजही 21 व्या शतकात हुंड्यासाठी अनेकांचं जीवन उध्वस्त होताना आपण पाहिलंय. आजही हुंड्यासाठी तरुणींना त्रास देतानाची अनेक प्रकरणं समाजात घडताना (Smita Ghuge Against Dowry) पाहायला मिळतात. अशातच पुण्यातील एका गिर्यारोहकानं हुंड्यासाठी जमा केलेल्या रकमेतून जगातील अनेक शिखरं सर करत हुंडाविरोधी नारा दिलाय.
हुंड्याविरोधात आगळीवेगळी लढाई : पुण्यातील धनकवडी येथील स्मिता घुगेला लग्नासाठी विविध ठिकाणांहून स्थळं येत होती. जेव्हा स्थळं यायची तेव्हा प्रामुख्यानं मुलांकडून मोठ्या रकमेचा हुंडा मागितला जात होता. तेव्हा या हुंड्याविरोधात स्मितानं स्वतःचं कर्तुत्व वाढवण्याला प्राधान्य देत ट्रेकिंग करायला सुरुवात केली. यातून जे पैसे तिनं हुंड्यासाठी जमा केले होते, त्याच पैशांतून तिनं जगभरातील अनेक शिखरं सर केली. या माध्यमातून आज ती हुंड्याविरोधात एक आगळीवेगळी लढाई लढत आहे.
हुंड्याच्या पैशांतून शिखर सर : याबाबत स्मिता घुगे म्हणाली की, माझ्या समाजात हुंडा खूप मागितला जायचा आणि हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होतं. तेव्हा मी ठरवलं की हुंडा न देताच मी लग्न करणार आहे. पण जेव्हा जेव्हा मला स्थळ येत होती, तेव्हा तेव्हा मुलांकडून कधी 20, कधी 10 तर कधी 15 लाख हुंड्याची मागणी होत होती. तेव्हा हुंड्यासाठी जमा केलेल्या पैशांतून जगातील उंच शिखर सर करण्याचा निर्णय घेतला. स्मिता पुढे सांगते की, सुरुवातीला कळसूबाई शिखर तसंच हरिश्चंद्रगडचा कोकणकडा सर केला. परंतू, 'हाय अल्टिट्युड' वरील माउंट किलीमांजारो हे शिखर पूर्ण करण्याचं माझं ध्येय होतं. त्यासाठी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेंनी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी 'हुंडाविरोधी' नारा देत आफ्रिका खंडातील सर्वोच्च आणि चढण्यासाठी अतिशय अवघड असलेल्या माउंट किलीमांजारो (Mount Kilimanjaro) हे शिखर 15 ऑगस्ट 2021 ला सर करत आपला तिरंगा ध्वज फडकावला.