पुणे -जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातून बाप मुलाच्या नात्याला कलंक लावणारा प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ कारणावरून मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वेल्हा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी गावात ही घटना घडली. रमेश विठ्ठल जोरकर (वय 55)असे मृत्यूमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. तर याप्रकरणी मारहाण करणारा मुलगा प्रकाश रमेश जोरकर (वय 29) याला पोलिसांनी अटक केली. 25 नोव्हेंबरच्या रात्री हा प्रकार घडला.
जेवणाच्या ताटावरून झाला वाद -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी मुलगा मित्रांसोबत घराबाहेर आला आणि त्याने पत्नीला जेवणाची ताटे घराबाहेर घेऊन ये असे सांगितले. यावर घरात बसलेल्या रमेश जोरकर यांनी तो काय जहागीरदार आहे का? घरात येईल आणि ताटे घेऊन जाईल असे म्हणाले. याच कारणावरून बापलेकात वाद झाला.