पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले; उभी पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल - अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
पुणे जिल्ह्याला शुक्रवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
राजगुरुनगर (पुणे) -जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्याला शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात लागवड झालेली ऊस, मका, ज्वारी,कांदा, यांच्या तरकारी माल, भाजीपाल्यासह फळबागांचे या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्याच महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाच्या नुकसानीतून सावरलेला शेतकरी या पावसाने हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर-
यंदाच्या वर्षी शेतकऱ्याला परतीच्या पावसामुळे प्रंचड नुकसानीला सामोरे जावे लागले होते. अतीवृष्टी, पूरपरस्थिती यामुळे खरीप हंगामासह डाळींब, द्राक्षे उत्पादत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी हाती आलेले उत्पादन हिरावले गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसाच्या नुकसानीने आणि बोगस बियाण्याच्या फटका बसल्याने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी कर्जे काढून पेरण्या केल्या त्यातही गेल्या महिन्यातील अतिवृष्टीने नुकसान झाले. त्यानंतर कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी शासनदरबारी मदतीचा हात मागितला. मात्र काही भागात पंचनामे झाले तर काही भागात पंचनामे ही झाले नसल्याने नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यातच आता अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी कर्ज फेडीच्या चिंतेने ग्रासला आहे.