बारामती- आगामी काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनेल कसे निवडून आणता येईल. याबाबत तेराही तालुक्यातील प्रमुख एकत्रित बसून चांगल्या प्रकारचा मार्ग काढू. जसे की, शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन लाखापर्यंतचे पिककर्ज होते. ते आता पाच लाखापर्यंत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बचत गटांना कमी व्याजाने कर्ज -
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, पुणे जिल्हा बँकेचा ढोबळ नफा पावणे तीनशे कोटी रुपये झाला. या ढोबळ नफ्यातून वेगवेगळी तरतूद करून पंचावन्न कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे पवार यांनी सांगितले. बँक आपली आहे. नफा मिळवणे हे उद्दिष्ट नाही. मिळालेल्या नफ्यातून शेतकरी महिला बचत गट तसेच ज्या साखर कारखान्यांच्या व्याजावर बँक चालते. त्यांना कमी व्याजाने कसे वितरित करता येईल याचाही निर्णय केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अवैद्य धंदेवाल्यांना पवारांचा इशारा -
झटपट श्रीमंत होण्यासाठी गैर मार्गाचा अवलंब करू नका. याची टोपी त्याला त्याची टोपी याला असल्या भानगडी करू नका. चुकीच्या रस्त्याने जाऊ नका, चुकीचा विचार करू नका, अवैद्य व्यवसाय करू नका, अन्यथा पोलिसांकडून तुमचा बंदोबस्त केला जाईल. कोणाचीही हायगय केली जाणार नाही. असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.